Thursday, January 14, 2016

भांडण !!!

खुप दिवसांपुर्वी हे लिहिले होते..अपलोड करायला आजचा मुहुर्त उजाडला...

भांडण !!!
आता मी काही मित्रा-मित्रां मधले किंवा भाऊ-बहीण किंवा office मधले अशा भांडणां बद्द्ल बोलत नाहीये.. हे आहे नवरा-बायको मधले भांडण...त्यामुळे मुळात या विषयावर लिहयचेच का? कारण "लिहायला आजुन काही विषय नव्हते का?" या मुद्द्यावरुन भांडण होईल...

खरे तर नवरा-बायको म्हणले की भांडण आलेच...पण जशी जशी लग्नाला जास्त वर्षे होत जातात तसे तसे भांडण हा गांभिर्याने घेण्याच्या ऐवजी मजेचा भाग होतो असे मला वाटते..म्हणजे कदाचित "कीतीही भांडलो तरीही आपला नवरा / बायको एकदम hopeless आहे" असा साक्षात्कार दोघांनाही दर वेळेस नव्याने होत असावा..आणि "आलीया भोगासी, असावे सादर" यामुळे किंवा मग एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव अधिक असल्यामुळे कदाचित भांडण seriously घेतल्या जात नसावे असे मला वाटते..

तशी माझी आणि शिल्पाची भांडणे खुप कमी होतात (आज-काल) ..याचा अर्थ आज-आणि-काल भांडण झाले नाही एव्हडेच :-) असा घेऊ नये .. :-) कदाचित भांडणात कोणीच जिंकत नाही आणि शेवटी कंटाळाच येतो म्हणुन आशात आम्ही भांडतच नाही..पण जर का सासरच्यांची फ़ारच आठवण यायला लागली तर मग होऊन जाऊ देतो .. :-)

सुरुवाती-सुरुवातीला भांडणे कशामुळे होतात ? हा काय प्रश्न आहे का? Actually भांडणे कशामुळेही होतात आणि अगदी ’प्यार का पंचनामा’ मध्ये दाखवल्या प्रमाणे ’१० मिन. पुर्वी Jaanu, I love you ... तर १० मिन. नंतर it's not working' ..btw..’वो ऊंगली वाला मेरेसाथ भी हुवा है" :-) ... हा तर.."it's not working" हा प्रकार समजायला मला जरा वेळ लागला...म्हणजे जर बायको ने फ़्रीजवर "It's not working..I am going to my Mom's place" अशी चिठ्ठी लिहीली तर मी बहुदा फ़्रीज उघडुन पाहिले असते..आणि "काय बायको आहे..थंड तर आहे की" अशी reaction दीली असती... अस्सो....

हा फार नाजुक विषय असल्यामुळे जरा जपुन लिहावे लागत आहे..

आता.." मी कशी दिसत आहे?" या प्रश्नाचे उत्तर तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली आहेत यावर अवलंबुन आहे..माझे सर्व पती वर्गातले मित्र मला साथ देतील अशी अपेक्षा करतो..आता " अरे वा ! मस्तच" असे उत्तर दिलेत तर संपलेच.."दर वेळेस काय तेव्हडेच म्हणतोस ?" .. तुम्ही खुप मनापासुन सांगितले असेल तरीही ९९% वेळेस यातुन सुटका नाही.. एखादा dress घालु नकोस हे सांगताना "तु त्या dress मध्ये छान दिसत नाहीस" असे न म्हणता "तुझ्यावर तो dress छान दिसत नाही" असे म्हणावे..अन्यथा रात्री झोपण्यासाथी मित्राचे घर . :-)

बायकोने बनवलेला पदार्थ कसा झाला आहे ह्या प्रश्नाचे उत्तर अचूक देणार्यास बिनधास्त नोबेल (शांती साठी ) पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे . . कारण "अप्रतिम , सुंदर , फारच छान . . " अशी उत्तरे देऊन सुद्धा (whether you like it or not..) पुन्हा "खरे सांग ना . . " असे विचारण्यात नाही आले तरच नवल . .

माझ्या नवीन लग्न झालेल्या मित्रांसाठी माझ्याकडे एक मोलाचा सल्ला आहे . . जर बायको म्हणाली की "अमुक -अमुक करूयात . . " किंवा तत्सम गोष्ट . . तर . . एक बघा की ती गोष्ट घडायला आजून किती वेळ बाकी आहे. . आणि समजा १० मिन पेक्षा जास्त वेळ असेल तर डोळे झाकून बिनधास्त "हो " म्हणुन टाका . .
९९% वाद यातच मिटतात . . आता यातली खरी गंमत सांगतो . . ९९% वेळेस या १० मिन मध्ये सुद्धा बायको तिचा विचार निदान ३ वेळेस तरी बदलते . . आणि तिसऱ्या बदला नंतर कदाचित तुम्हाला हवी असलेलीच गोष्ट ती सांगते . . आणि तुम्ही "आता तू म्हणतेच आहेस तर तसे . . " असे म्हणुन great बनु शकता . .
याची उदाहरणे : Hotel मध्ये food order करताना . . किंवा . . Movie कोणती पाहायची हे ठरविताना . .

आता ही गोष्ट जर फार नंतर घडणारी असेल (म्हणजे १ तास किंवा आजून नंतर ). . . मग तर tension घेऊच नका . . . ९९% वेळेस ती स्वतःच ते विसरून जाते . . मग आत्ता भांडण करून mood कशाला घालवता ?
याचे उदाहरण : "आपण या Dec मध्ये New Zeeland ला जाऊयात "… डोळे झाकून "ओके " म्हणा . . .
किंवा रस्त्यातून जाताना काचेमागे दिसणारा "मला हा dress घ्यायचा आहे "… यावर "कशाला ?… परवाच तर ४ घेतलेस ना … " असे न म्हणता "अरे वा.. सही " इतकेच म्हणा … बाकी … don't worry...

BTW... मी हे मगाशी पासून ९९%-९९% असे म्हणत आहे … समजा तुमची case उरलेल्या १% मधली निघाली तर ???
तर काय … मित्रा … तसाही तुझ्याकडे काही पर्याय आहे काय ? :-)
Monday, November 25, 2013

माझी बायको..बायको देखणा दिवा...

मागे बायको म्हणाली होती की माझ्यावर कधी लिहिणार तु ?
आज आपला मुड आहे बायको बद्दल लिहिण्याचा... तर होऊन जाऊ देत...
तसा आपण घाबरत नाय :-)

माझी बायको..बायको देखणा दिवा...

Reading बी करते,
Painting बी करते,
शास्त्रीय बी गाते कवा कवा...
माझी बायको..बायको देखणा दिवा...

पास्ता बी बनवते,
बरीटो बी बनवते,
पुरण पोळी बी करते कवा कवा...
माझी बायको..बायको देखणा दिवा...

PhD बी करते,
मंगळागौर बी करते,
स्कुबा dive बी मारते कवा कवा...
माझी बायको..बायको देखणा दिवा...

Shorts बी घालते,
गॉगल बी लावते,
नऊवारी बी नेसते कवा कवा...
माझी बायको..बायको देखणा दिवा...

Swimming बी करते,
Bowling बी करते,
Temple वर runते कवा कवा...
माझी बायको..बायको देखणा दिवा...

- शार्दुल :-)

Tuesday, March 12, 2013

नावात काय आहे?

बऱ्याच लोकांच्या नावा बद्दल आज बोलायचे आहे .. पण सुरुवात स्वतः पासुन करावी असे म्हणतात ना... चला.. "शार्दुल" .. संस्कूत शब्द ... याचा अर्थ "सिंह" .. आता वाघ का सिंह ही चर्चा पुन्हा कधी .. पण मुळातच गरीब "गाय" किंव "गरीब guy" असा माझा स्वभाव .. पण नाव मात्र शार्दुल.. :-).. अस्सो.. नावात काय आहे म्हणा...

माझा जन्म ज्या दिवशी झाला ना त्या दिवशी भारताने पहिल्यांदा cricket world cup जिंकला होता .. ( btw...कसल भारी वाटत ना असे पहील्यांदा, दुसर्यांदा असे लिहीताना :-) .. अस्सो... या विषयावर पुन्हा कधी.. ) .. तर खुप लोकांनी आई-बाबाना सुचविले होते की मुलाचे नाव "कपिल" ठेवा.. नशिब माझे...Man of the match मोहिंदर अमरनाथ म्हणुन नाव "मोहिंदर" ठेवा असे नाही सुचविले आणि त्याहुन नशिब असे की आई-बाबांनी असे कुणाचे काही ऎकले नाही... Imagine ..मोहिंदर प्रकाश सिरसमकर ... अस्सो....

आता बघा.. माझ्या बहीणीचे नाव आणि बायकोचे नाव एकच.. दोघीही शिल्पा ... शिल्पा म्हणले की पटकन मला "शिल्पा चार चांद लगाये" हे अठवते.. इकडे.. एक टीकली लावते, दुसरी नाही... :-) माझ्या लग्नात सगळेजण मागे लागले होते की बायकोचे नाव बदल.. मी म्हणालो नावात काय आहे? आणि जेव्हा नाव बदलणार नाहीच असे ठामपणे सांगितले तेव्हा बाबांनी पण एक sixer मारुन घेतला - "चला, आता आम्ही म्हणु शकतो की आम्ही लेकीमध्ये आणि सुनेमध्ये फरक करत नाही" .. :-)

चला..एकदा स्वतःला चार शिव्या घातल्या की लोकांना हजार शिव्या घालायला मी मोकळा... त्याचे काय आहे ना, उगाच guilty feeling वगैरे असा काही येत नाही मग...

काय भन्नाट नावं ऎकतो आज काल .. "शुन्या" .. ??? ... आधीच सांगतो की हे मुलीचे नाव आहे... काय बोलणार आता? आता काय आई "plus one" आणि बाबा "minus one" ??? ..काय अरे ? ... "प्रद्युम्न" / "द्रुष्टःद्युम्न" ... ऎकायला ठीक आहे, पण अरे, त्या पोराची काय अवस्था होईल ... कितीतरी वर्ष बिचारा स्वतःचे नाव नीट सांगुच शकणार नाही...आणि मोठा झाल्यावर जर का हा asia-pacific मध्ये काम करायला आला तर ... मी गेल्या पाच वर्षात असा एक पण सिंगापुरकर पाहीला नाही जो माझे नाव व्यवस्थित घेऊ शकेल... याचे काय होईल ? ..अस्सो...

बर्याच वेळेस आपले नाव सरळ सोपे असुन पण काही फायदा नाही हो...आता बघा.. "महेश" .. कीती सोपे आहे म्हणायला...पण Singapore मधील माझ्या जुन्या office मधील एक महाभाग गेली ५ वर्ष याला खुपदा सांगुन देखील त्याला "मकेश" असे म्हणतो.. "अरुंधती" ला "अरुहंती" म्हणतो.. "विजय" ला "विजे" .. "कुमार" ला "कुमा" ..आणि "कौस्तुभ" तर याला बापजन्मी जमणार नाही... अस्सो... या लोकांबद्दल जास्त नको.. त्यांची एक-एक नावं मला म्हणुन दाखवायला सांगितली तर माझी वाट लागेल.. अहो खरच.. मला सांगा.. "Ng" हे काय आडनाव आहे? आजुन एक .. "Ngo" .. ?? कसे उच्चारायचे? .. "Xu Ning" या ताईचे नाव "शी निंग" असे उच्चारायचे तर "Xu Chu" या दादाचे नाव "शु चु" असे म्हणायचे... बरे आहे की "Zhang XuePing" याला सगळे XP असे म्हणतात.. आता याचा उच्चार "झ्यांग झुपिंग" नसुन "शांग शेपिंग" आहे हे कसे कळणार ?... अस्सो....

पंजाबी लोकांची नावं एकदम गमतीदार असतात...परवाच facebook वर पाहीले हे... ह्या लोकांना बहुतेक शाळेत असतानाचा ’जोड्या लावा’हा प्रकार खुप आवडत असेल... हे लोकं काय करतात - गट ’अ’ मध्ये लिहितात - मन, जस, सुख, बल, खुश ... आणि गट ’ब’ मध्ये लिहीतात - प्रीत, मीत, गीत, दीप, विंदर .... झालं.... आता मनात येईल तशा लावा जोड्या... ढिगाने नावे तय्यार ... मनप्रीत, मनमीत, जसप्रीत, जसविंदर, बलदीप, बलविंदर .. पाहीजे ते combination.... आता आपले बाबु लोकं... मला वाटते की ही लोकं नावं पण कहीतरी खाता-खाता ठेवतात.. प्रनोब, अर्नोब, पार्थो ... रसगुल्ला तोंडात ठेऊन म्हणली की बरोब्बर उच्चारली जातात .. आणि आथो आपले गुज्जु भाई.. यांची तर भगवान मा एकदम श्रद्धा छे...म्हणुन .. धर्मेश, जिग्नेश, परेश, कल्पेश...
"संगीथा", "कविथा", "प्रीथी" या दाक्षीणात्य "थ" वाल्या नावांबद्दल तर मी बोलणारत नाहीये.. याचा नुसता विचार जरी केला ना तरी मला तीतकाच राग येतो जीतका toilet seat वर बघीतल्यावर तमाम बायको वर्गाला आप-आपल्या नवर्याचा येतो :-)

मला एकदम "वऱ्हाड .. " मधले ते आठवले .. "नाव कशी असतात? कलवती, मैनावती, चंपावती... " .. याच style मध्ये मला वाटत की आमच्या बाबांचा एक काळ होता जेव्हा नावं होती - अरुण, अशोक, वसंत ... नंतर आमचा काळ आला, नावं झाली - अमित, राहुल, आनंद... आता पुढचा काळ... आता काय trend येतोय.. देव जाणे.... !!!

Sunday, February 17, 2013

विषय काहीही नाही : बायकोने दिलेला challenge !!!


आजचे काम हे खरे अवघड ... "Cricket" आणि "पु.ल." या दोन विषयांना सोडुन post लिहुन दाखव असे बायको म्हणाली ... म्हणाली काय - challenge च ना हा ? आणि बायकोने दिलेला challenge म्हणजे ..? अरे एक वेळ आपण boss ला तोंडावर सांगु .. (Ref: शिरीष कणेकर.. ’bossला तोंडावर सांगतो...येणार नाही..तुम्ही तुमच्या घरी शहाणे, आम्ही आमच्या घरी शहणे’.. आपल्याला काय, पु.ल. नाही तर त्यातपुरते कणेकर पण चालतात ... त्यांच्यावर बंदी आली तर व.पु. आहेतच..आणि नाहीच तर प्र.के. etc..पण आपल खरं प्रेम म्हणजे पु.ल. :-) ) ... अस्सो... तर एक वेळ boss ला तोंडावर सांगु की जमणार नाही..पण बायको ? ... कदापी नाही...

तर सुरुवातीलाच पु.ल. आणि cricket या माझ्या आराध्य ( ’आराध्या’ नाही... हि काळी का गोरी आजुन पाहीली नाही..पण हीचे (का हिच्या आई-बाबांचे?) फ़ार नखरे हो म्हणे..अस्सो...या बद्दल पुन्हा कधी..).. तर..पु.ल. आणि cricket या माझ्या आराध्य दैवतांची माफी मागुन सुरुवात करतो...

तर पु.ल. आणि cricket सोडलं ना तर चघळण्या सारखा विषय तो एकच.. तो म्हणजे राजकारण...आता राजकारणाच्या शाळेत मी मुळात बिगरीतच गेलो नाही तर matric फार दुर राहीले... sorry sorry..हा ref नाही वापरता येणार ना.. :-) .. तर मुद्दा काय की आपल्याला राजकारण कळत नाही, झेपत नाही आणि जमत नाही ... officeमध्ये चुकुन कधी-कधी होऊन जाते तो भाग वेगळा :-) ...पण पेपर मध्ये, News मध्ये जे महाराष्र्टातले, भारतातले किंवा जागतीक जे काही राजकारण आहे त्याबद्दल आपल्याला लिहीता येत नाही...

या नंतरचा महत्वाचा विषय म्हणजे Cinema / movies ...Hollywood आपल्याला जमत नाही किंवा झेपत नाही या पेक्षा पटत नाही असे मी म्हणतो... येथे आपला गांधीजींचा स्वदेशी बाणा.. पण हिंदी चित्रपटां बद्दल या आधीच खुप भरभरुन लिहिले आहे..त्यामुळे ते पण नको...नाटकं आपण आयुष्यात कधी केली नाहीत ना कधी कोणाची खपवुन घेतली..त्यामुळे तो विषय पण राहीला...


आता वाटत आही की आपल्याला एखादी कला अवगत असायला हवी होती...बाकी काही नाही निदान लिहण्या पुरती का होईना पण कामाला आली असती.. त्याचे काय आहे, शाळेत असल्या पासुनच चित्रकला, हस्तकला ईत्यादी-ईत्यादी कला गुणांना वाव देण्यासाठी आपल्याला वेळच मिळाला नाही.. मुळात, सुमित म्हणतो तसे शाळेत आपण कायम ’मार्क्स विरोधी’ गटामधले ... त्यामुळे ’जडत्व’, ’तन्यता’असल्या technical गोष्टीं ऎवजी ’मित्रत्व’ व ’बंधुता’ अशा non-technicalगुणांवर आपला जोर आधिक.. विषेशतः परीक्षेच्या दिवसात.. आणि यात इतके आतोनात कष्ट पडले की बाकी कशाबद्द्ल प्रेम तर सोडाच साधी उत्सुकता पण निर्माण झाली नाही... पुढे नोकरी करताना ’ह्याला हे काम चिकटव, त्याला ते काम चिकटव ’ किंवा ’ याचे काम त्याला चिकटव’ अशी कामे आपण शिताफीने केली ... पण मुळात असे काही मिळालेच नाही की ज्या बद्दल ऊर ओसंडुन लिहीता येईल... ’माणुस कसा तयार झाला’, Evolution, Civilization, Global warming etc असल्या चुकार गोष्टींमुळे आपला पगार कधी थांबला नाही त्यामुळे आपण पण कधी प्रेमाने त्यांची विचरपुस केली नाही..

आता तसे लिहायचे म्हणले तर ’जगात तेलाच्या किंमती ६ महीन्यात अचानक २०% का घसरल्या’..किंवा 'अमेरीकेचे नैसर्गिक वायु निर्यात धोरण’.. किंवा ’ चिनचे आयात धोरण’, अल्जेरिया-नायजेरिया-अंगोला अशा देशांमधील National Oil Companyचे CAPEX आणि OPEX असल्या रुक्ष विषयांवर मी बराच बोलु शकतो..पण ते इथे वाचणार कोण? .. आणि मुळातच ते तसे बोलण्या / लिहीण्यासाठी मला पैसे मिळतात...engineering च्या काळात खुप मारवाडी मित्र बरोबर असल्यामुळे असेल पण "इथे काय मिळणार" हा प्रश्न लगेच येतो... इथे फ़ुटकी कवडी पण कोणी देत नाही... साधी comment टाका म्हणुन पण इथे मागे लागावे लागते तर बाकी सर्व सोडा... त्यामुळे तो विषय पण नको...

मला काय वाटते की तसे मी या post मध्ये बरेच काही लिहीले आहे... निदान ’Cricket आणि पु.ल. या दोन विषयांना सोडुन post लिहुन दाखव’ हे challenge पुरे करण्या इतपत तरी लिहीले आहे असे मला वाटते... त्यामुळे बायको - How's that?

Wednesday, January 18, 2012

Facebook Vs Orkut

लोक मला विचारतात की "काय रे, FB वर आहेस ना? मग तिथे बोलु".. तसा मी facebook वर आहे पण ते अगदीच "आहे" म्हणण्या पुरताच ... म्हणजे मी काही अचानक ’काय रे तुमच्या मुलांचा तो पोरखेळ’ अस वाटण्या इतका म्हातारा झालो नाहीये...पण..पण..पण..कुथेतरी राहुन राहुन वाटते की "orkut की बात कुछ और थी "... कदाचीत orkut चे ते नाविण्य असेल किंवा माझ्या मनातले social n/w site बद्दलचे कुतुहल... मला orkut खुपच आवडले होते ...

काय छान दिवस होते ते...म्हणजे अगदी पु.लं. च्या ’पेस्तन काका’ मध्ये जसे ’महाराजांच्या टायमाला ...’ म्हणुन गाडी सुरु, तसेच माझे होते...अकबराच्या दरबारात जशी नवरत्न उठुन दिसायची तशी माझ्या orkut profile मध्ये १७-१८ testimonials शोभुन दिसायची...त्या काळी ७००-८०० मित्रांचा friends list मध्ये वावर होता ... १०,००० scraps तर मी इतक्या सहज ओलांडल्या जश्या की सचिन ने १०,००० ODI runs... पण तेच ... one-day चा जमाना जाऊन T-20 आले आणि इकडे orkut चा जमाना जाऊन FB आले... मी पुन्हा एकदा माझे पु.लं. प्रेम व्यक्त केले - " आमच्या काळी social networking असे नव्हते " :-) :-) :-)

काय काय नविन प्रकार असतात या facebook वर ... like काय... tag काय...पुर्वी कसे C, C++ चे क्लासेस असायचे ना, तसे आता facebook चे क्लासेस काढावेत...poke करणे म्हणजे नक्की काय हे मला आजुन पण कळलेले नाही... wall हा तर या सगळ्यांचा कळस ... माझा एक मित्र त्याच्या छोट्या मुलाला भिंतीवर लिहीले म्हणुन रागवतो आणि स्वतः मात्र दिवस-रात्र दणा-दण लोकांच्या भिंती रंगवत बसलेला असतो..

माणसाने social असावे या बद्दल माझे दुमत नाही... पण .. ’आपण आत्ता बाकीच्या अमुक-तमुक टवाळां बरोबर कोणत्यातरी mall मध्ये चकटया पिटतो आहोत’ याचे लोकांना काय? .. किंवा मग मी आत्ता १० min पुर्वी काय खाल्लं याचे ग्यान जगाला कशाला? .. उद्या तुम्ही काहीही लिहाल... तुम्ही खरे पु.लं. प्रेमी असाल तर तुम्हाला हा संर्दभ लगेच लागायला पाहीजे - हा कुळकर्णी आणि त्याचे दास/दासी आपली-आपली पोटं कशा पद्दतीने साफ़ करतात याचे ग्यान जगाला कशला? ... :-) :-)

link किंवा post share करणे हा माझ्या सारख्या orkut करांना नविन प्रकार होता... पण हे खरच interesting आहे ..दुनिया भरच्या गोश्टी इथे कळतात ... 'Kolaveri Di' लोकप्रिय होण्या मागचे ९०% श्रेय facebook ला आहे असा माझा जाहीर दावा आहे ... आणि उरलेले १०% सोनु निगम च्या छोट्या cute मुलाला :-) :-) :-)

जसे T-20 popular झाल्यावर लोकांचा ODI मधला interest कमी झाला किंवा ICC ला तरी तसे वाटले म्हणुन त्यांनी लगेच ODI मध्ये power play, free hit अरे आकर्शक बदल केले तसेच FB आल्या नंतर orkut मध्ये पण बदल केल्या गेले...पण खर्या cricket प्रेमीला जसे test cricket मना पासुन आवडते तसे मला orkut आवडायचे ... नंतर IPL पासुन inspire होउन इथे twitter, google+ असे प्रकार पण आले...पण त्या बद्द्ल नंतर कधीतरी...

या FB ला खर मानल पाहीजे पण... लोकांच्या भावनांना अगदी ऊत येतो .. ऊह, आह ते आऊच पर्यंत.. जसे काही IODEX चीच जाहीरात ... निमित्त काय - तर एक college मधली मुलगी ... sorry..sorry... एक college मधली रिकमटेकडी कार्टी आपल्या phone वरुन lecture चालु असताना facebook वर status टाकते " I miss my home very much" ... Bosssss.... २०-३० comments आणि ५०-६० likes ची खात्री आपली ... आज-काल इतकी guaranty तर colgate वाले पण त्यांच्या paste ची देत नाहीत ...

इथे philosophy झाडायला वाव आहे... अण्णा-गिरी करायला वाव आहे .. मुन्नाभाई च्या काळात FB इतका लोकप्रिय असते तर यावर गांधिगिरी पण झाली असती... you tube ला तशी कशाचीच कमी नाही.. पण FB मुळे त्यांना पण जास्त सुखाचे दिवस आले आहेत...संदिप खरे ने हे सगळे आधी पाहीले असते तर कदाचीत ’आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो’ च्या ऎवजी ’आताशा मी fbवर पण poke करीत बसतो’ अशा आशयाचे गाने पण लिहिले असते ...

I don't hate facebook ... मी स्वतः facebook वर आहे ... मीही तेथे photo टाकतो... लोकांनी ते like करावेत असे मला पण वाटते... पण जरा अती झाले असे वाटले म्हणुन ही post ... मगाशी म्हणालो ना की orkut म्हणजे test match .. test cricket आवडत असले तरीही सचिन तेंडुलकर T-20/ IPL खेळतो ... अहो, इथे देव स्वतः मोह आवरु शकत नाही तिथे माझ्या सारख्या पामराची काय व्यथा?

Wednesday, December 15, 2010

माझे "खाण्या" वरचे प्रेम !!!

बर्याच वेळा मित्र एकमेकांशी फोन वर तास भर बोलतात आणि मग सगळ बोलुन झाल्यावर काही विषय उरला नाही की मग "काय ... झालं का जेवण ?" हा प्रश्न विचारतात ... हा प्रश्न आला की समजावे की फोन ठेवण्याची वेळ झाली... मी या गोष्टी बद्दल किंवा या प्रकारा बद्दल जाहीर नाराजी व्यक्त करतो... "जेवण झाले का?" किंवा "आज काय बेत?" या सारख्या interestsing topic पासुन गोष्ट सुरु करण्या ऐवजी शेवट करणे कसे शक्य आहे ?

या गोष्टीचे महत्व हे केवळ "वाढता वाढता वाढे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य आहे तेच लोकं समजु शकतील ... एकंदरीत खादाडीवर अमाप प्रेम असणार्या मझ्या असंख्य बांधवांचा मला पाठींबा आहे असे मी येथे ग्रुहित धरतो... :-)

आता आमचे घारपुरे ... "आज काय बेत?" यावर आठवड्यातुन तीन वेळेस तरी "शिकरण" असेच उत्तर देतात ... मग मी पण तेच ते "खा लेकहो ... शिकरण पोळी खा...मटार उसळ खा" असे बोलुन माझं पु.ल. प्रेम व्यक्त करतो ..... अशा प्रकारे पु. लं. ची आठवण करुन देणारी गोष्ट म्हणजे "खादाडी वरचे प्रेम" याला प्रचंड महत्च प्राप्त व्हयला पाहीजे हे मी अगदी "सिरसम जिल्हा झालाच पाहीजे" या उत्साहात म्हणतो...

एकंदरीत ’खाणे’ या गोष्टीवर माझे प्रचंड प्रेम आहे ते तुमच्या लक्षात आले असेलच... माझी ती gtalk वरची status line तर तुम्हाला माहीत आहेच .... "I am on a see (sea?) food diet ... whenever I see food, I eat" ...तर....मी कधीही खाऊ शकतो..जशी चहाची काही ठरावीक वेळ नसते तशी खाण्याला पण वेळ नसते या मताचा मी ... प्रवास म्हणजे तर माझ्या सारख्या खवय्ये मंडळींना आनंदाची पर्वणीच...आणि आता प्रवासा दरम्यान खाण्या मध्ये तुम्ही Hygiene सारख्या क्षुल्लक गोष्टी आणु नका राव...आता...पाणि पुरी बनवणारा माणुस जितका अस्वछ तितकी पाणि पुरी चविष्ट हा जग मान्य नियम आहे की नाही? त्यामुळे let's not talk about hygiene ....(म्हणल की विंग्रजी शब्दा बद्दल बोलताना एक तरी विंग्रजी वाक्य टाकाव ... :-) )

आता मागच्या India trip मध्ये फक्त २ दिवस होतो औरंगाबाद ला..त्यात सुढ्हा(हा शब्द फार महत्वाचा आहे हा:-) ) तर त्यात सुढ्हा एका रात्री बायकोला घेऊन क्रांती चौकातल्या सगळ्यात कोपर्यातल्या अंधारातल्या पाव-भाजी च्या गाड्यावर पाव-भाजी खायला घेउन गेलो...अंधार नसता तर तीला कळाले असते ना की तो पाव-भाजी वाला कसा आहे ते....छे.... काही केल्या बायको तयार होइना... मी एकटयानेच मिटक्या मारत पाव-भाजी खाल्ली ... बायको ला क्रांती चौकात पाव-भाजी खायला घेऊन जाण्याचे महत्व माझ्या सारखे औरंगाबाद प्रेमीच जाणणार म्हणा.... :-)

एखादा problem असेल तर त्याच्या मुळाशी जायचे आणि तिथेच तो सोडवायचा हा माझा मुळ स्वभाव .. (जरा अति झालं का? ..अहो..आता काय करणार...बाकी कोणी बोलत नाही म्हणुन स्वतःच सांगितले ...असो...) तर...त्या प्रमाणे कधी माझी बायको म्हणाली की डोके दुखत आहे किंवा पोट दुखत आहे तर मी पटकन त्या प्रश्नांच्या मुळाशी जातो आणि तीला सुचवतो की ’तुला भुक लागली असेल’ .... झालं... बायको बाकी सगळे मान्य करेल पण हे मान्य करायला तयारच नाही.... अहो....जगातले इतके मोठे-मोठे problem "खाण्याने" सुटतात ..इथे तर फक्त डोके दुखणे अशी साधी बाब आहे....अस्सो.....

तर मुळ मुद्दा काय ? .. काय ? मुळ असा काही मुद्दाच नाही? ...नसु द्या.....पण एकच महत्वाचे .... खाण्यावर प्रेम करा ... :-)

या विषयावर आपण बोलतच आहोत म्हणुन अठवले .... तुम्ही जर खरच रसिक ’खाणारे’ असाल तर तुम्ही एक funda मान्य कराल ... तो म्हणजे "फुकट ते पौष्टीक" .... ऊगाच काही नाही... ...अहो...... office च्या meetings दरम्यान मिळणारे pizza , buscuit, softdrink पासुन ते पंचतारांकीत होटेल मध्ये होणारे lunch, dinner, BBQ हे सर्व याच प्रकारात मोडतात ..... आपल्याला तर बुवा आवडले असले सगळे ... म्हणजे meetings मधल्या discussion पेक्षा पण खायला काय आहे यावर जर ती meeting किती महत्वाची हे कोणी ठरवत असेल तर मी त्या माणसाचा मना पासुन आदर करतो ..... :-)

चला .... बराच वेळ झाला.... नुसता लिहीतोच आहे.... भुक लगली.... काहीतरी खाऊन येतो... :-)

Tuesday, September 7, 2010

Gtalk Status !!!

Gtalk वर status म्हणुन public काय वाट्टेल ते लिहीतात ... कोणीही या आणि Philosophy झाडुन जा ... अगदी तसेच जसे मंदिर की घंटा ... कोणीही या आणि वाजवुन जा ... किंवा मग अगदी तसेच जसे कोणी सुरज रणदीव ने या आणि ५ विकेट्स घ्या ... मजा येते पण वाचायला...
परवा बर्याच दिवसांनी log-in केले gtalk वर... ’status काय लिहावे ’ असा विचार करत होतो ... "Busy? " ...शक्य आहे का ? ... त्यावर पक्षी तरी विश्वास ठेवतील का ? :-) एखाद्या मस्त गाण्याच्या २ ओळी लिहाव्या म्हणले तर पटकन perfect गाणेच आठवले नाही ... सहज विचार केला की सध्या काय चालु आहे.... एकदम अंदर से आवाज आइ " Life क्या मस्त है !!!" ....

तसे मला बरेच quotes आवडतात ... पण बहुतेक मी सगळ्यात जास्त वापरलेला quote म्हणजे .. " I am on a see (sea?) food diet ... Whenever I see food, I eat " .... हे हे :-)
हेच कारण आहे माझ्या खात्या-पीत्या (?) घरचे लख्शण असण्याचे ... :-)
अरे रे ....झालं ... चुकीचा विषय काढला मी.... Yeeees शिल्पा .... आज संध्याकाळी पळायला जाणार आहे मी ... :)
( आता आज परत डोकं लढवुन नविन excuse शोधाव लागणार ... )

सचिन कस्तुरे म्हणुन माझा एक मित्र आहे ... बर्याच वेळेस gtalk वर log-in करताना त्याचे status check करणे ही एक उत्सुकता असते ..
जसे की हिरो ने आज लिहीले आहे
" मत इंतजार कराओ हमे इतना
की वक्त के फ़ैसले पर अफसोस हो जाये ...
क्या पता कल तुम लौटकर आओ
और हम खामोश हो जाये ....
किसी पत्थर की मुरत से मोहोब्बत का इरादा है .... "
चोर साला .... लेकीन चोरी भी क्या खुब की दिल खुष हो जाये ..... :-)

परवा सकाळी log-in केले तर एकाचे status - " When snake is alive, snake eats ants. When snake is dead, ants eat snake. Time can turn in any time. Don't neglect anyone in your life ... "
म्हणले अरे बाप रे... काय हे सकाळी सकाळी ??? ..... बरेच दिवस मी याला neglect करत होतो...... आज पटकन त्याला ping केले आणि "Good Morning - Good Day " करुन टाकले ... :-)

आता आमचे जोशी बुवा ... यांना गनिमी काव्याने लढायला आवडते ... max वेळ तर ते भुमिगत ( invisible) असतात ... पण तर कधी ते प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन देण्याचे ठरवले तरी कमीत-कमी बोलणे यावर त्यांचा जोर असतो ....मग status काय तर " Be Good"
नेमके कळतच नाही की हा प्रामाणिक पणे कबुल करत आहे की " In future, I will be good " का मग आपल्याला दरडावतोय " You better be good ... " .... he he he

गोगट्या म्हणतो ," When I need you, I just close my eyes... " ......
आतीच्यायला .... ( once again अशोक सराफ़ estyle बर का ).... आमच्या बाबतीत कधीच असे का होत नाही ?
आम्ही डोळे बंद केले की कायम झोपच लागते ... हे हे
असत बाबा नशिब एखाद्याचे ....

रचना चे status मस्त होते ... " Either write something worth reading or do something worth writing.... "
बहुतेक माझे blog वाचुन तीला हे सुचले असावे... :-) ... तीने मनात विचार केला असेल की हे वाचुन तरी शार्दुल आजुन फ़ाल्तु blog लिहिणार नाही ..... :)